महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीची रंगरंगोटी, शौचालयाची साफसफाई पण..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिकठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती रंगल्या असून इतकंच नव्हे तर शौचालयात चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचे सचित्र वृत्त महा पोलीस न्यूजने प्रकाशित केले होते. बातमीनंतर लागलीच पोलीस प्रशासन जागे झाले आहे. गुटखा खाऊन रंगवलेल्या लाल भिंतीची रंगरंगोटी केली जात असून प्रसाधनगृहांची स्वच्छता केली जात आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात नेहमी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि सेवनकरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असतात. दरमहिन्याला लाखोंचा गुटखा पकडण्यात येतो तर किरकोळ कारवाया देखील सुरू असतात. महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ कलम ११५ (क), ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तरतुदीचे उल्लंघन केल्यास १२०० रुपये दंडाची देखील तरतूद आहे. तसेच कोटपा कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असतात.
नियमांचे सर्रास उल्लंघन
पोलीस अधीक्षक कार्यालयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ कलम ११५ (क), ११७ बाबतची माहिती आणि कारवाईचा संदर्भ देणारी सूचना ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशाची प्रत भिंतीवर चिकटवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे पोस्टर देखील लावण्यात आले आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी या सूचना आहेत. सूचनांकडे दुर्लक्ष करीत अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत असतात.
लाल भिंती पुन्हा झाल्या पांढऱ्या, शौचालय साफ
पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती लाल झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पुरुष प्रसाधन गृहात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. महा पोलीस न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत अवघ्या काही तासात प्रशासन कामाला लागले. गुटखा खाऊन थुंकलेल्या भिंतीची पांढऱ्या रंगाने रंगरंगोटी करण्यात येत होती. खिडकी, जिना, कोपरे पांढऱ्या रंगाने रंगवण्याचे काम सुरू झाले आहे.
पोलिसांना शिस्त लावण्याची गरज
महा पोलीस न्यूजने केलेल्या पाहणीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. बातमीनंतर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृहाचा कोपरा कोपरा साफ केला. थुंकीचे डाग, गुटख्याच्या पुड्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या हटवण्यात आल्या. दुपारपासून सुरू असलेले काम सायंकाळपर्यंत चालले. एकीकडे स्वच्छता सुरू होती तर काहींनी मात्र पुन्हा त्याच ठिकाणी गुटखा खाऊन पुडी टाकलेली दिसून आली. एकंदरीत पोलिसांनाच शिस्त लावायची किंवा दंड करण्याची गरज निर्माण झाली आहे.