तक्रार मागे घेण्यासाठी बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी
जळगाव : जळगाव महापालिकेचे निलंबित प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याला विविध मार्गांनी धमकावले, असा आरोप एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने केला आहे. डॉ. घोलप यांनी पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली असून, एका कंत्राटदाराच्या माध्यमातून बंदूक दाखवून दबाव आणल्याचे तक्रारदार महिलेने ‘विशाखा समिती’समोर लेखी जबाबात नमूद केले आहे.
महापालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी मनपाच्या विशाखा समितीमार्फत सुरू आहे. समितीने डॉ. घोलप यांच्याकडून लेखी खुलासा मागितल्यानंतर तक्रारदार महिलेचाही जबाब घेतला.
जबाबात महिलेने केले गंभीर आरोप:
महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने समितीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, डॉ. घोलप यांनी तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. तसेच, विशाखा समितीच्या एका माजी सदस्यानेही हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला. याशिवाय, डॉ. घोलप यांच्या सांगण्यावरून एका कंत्राटदाराने बंदूक दाखवून धमकावले. डॉ. घोलप यांच्या पत्नीनेही घरी येऊन तक्रार मागे घेण्यासाठी विनंती केली. तसेच, तक्रारदार महिलेच्या पतीच्या कार्यालयात जाऊन त्यांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
या गंभीर आरोपांनंतर समितीने डॉ. घोलप यांच्या पत्नीचाही जबाब घेतला, ज्यावर तासभर चर्चा झाली.
डॉ. घोलप यांना बडतर्फ करण्याची मागणी
तक्रारदार महिलेने समितीकडे डॉ. घोलप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. डॉ. घोलप यांच्यासारख्या विकृत व्यक्तीला आळा घालण्यासाठी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही महिलेने केली आहे. समितीतील एका माजी सदस्याकडूनही दबाव येत असल्यामुळे, ‘विशाखा समिती’ संबंधित महिलेला न्याय देणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.






