विधानसभा निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकत वाजविला विजयाचा डंका
महाविकास आघाडीचा सफाया, विरोधी पक्षनेते पदही मिळणार नाही अशी केली अवस्था
मुंबई विशेष प्रतिनिधी-लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात सवलत, शेतकऱ्यांना वीजबिलात माफी यासह विविध योजना महायुती सरकारने राबविल्याने याचा फायदा महायुतीला होऊन 288 पैकी 235 जागा महायुतीने जिंकत आपल्या विजयाचा डंका काल 23 रोजी लागलेल्या निकालावरून वाजविला. यामुळे या निकालात सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवीत महा युतीने घवघवीत यश संपादन केले असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. गतिमान विकास करणारे सरकार देऊ अशी ग्वाही महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 23 रोजी लागलेल्या निकालात भाजपला 132 शिंदे सेनेला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा, तसेच जनसुराज्य पक्ष दोन, रासप एक, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष एक, राजश्री शाहू आघाडी एक, अशा एकूण 235 जागावर बहुमत प्राप्त करून महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसला 16, उद्धव ठाकरे गटाला 20, आणि शरदचंद्र पवार गटाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकून महायुतीने 137 जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश प्राप्त करणाऱ्या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष नेते पदासाठी असणारे दहा टक्क्यांचे संख्याबळ किंवा 29 चा आकडा गाठता आलेला नाही अशी केविलवाणी अवस्था महायुतीने महाविकास आघाडीची केली आहे. महायुती सरकार मध्ये असलेले सर्वच्या सर्व मंत्री हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून यामध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, अतुल सावे ,मंगल प्रभात लोढा, छगन भुजबळ, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील ,अनिल पाटील ,दीपक केसरकर धनंजय मुंडे, उदय सामंत ,दिलीप वळसे पाटील, शंभूराजे देसाई या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.