नगरपालिका ठेकेदारांकडून मलई खाण्यात मस्त, अमळनेरचे नागरीक मात्र त्रस्त!
तांबेपुरा, सानेनगर भागात रामवाडी रस्त्याची दुरावस्था

महा पोलीस न्यूज । अमळनेर । पंकज शेटे । अमळनेर शहरातील रामवाडीकडून विप्रो कंपनीकडे जाणारा रस्त्याची खूप दिवसापासून दुरावस्था झाली असून, नागरिकांचे हाल होतांना दिसून येत आहे.
यासंदर्भात नागरिकांसोबत संवाद साधला असता, नगरपालिकेने भुयारी गटारासाठी रस्त्याचे खोदकाम केले होते, व भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यावर मात्र रस्त्याची परिस्थिती तशीच सोडून ठेकेदार व नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनही यावर कुठलीच कारवाई नगरपलिका मार्फत केली गेलेली नाही. नेहमी वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर नेहमी लहान-मोठे अपघात होत असतात. अश्यातच आज सकाळी पुन्हा एकदा भलामोठा ट्रक या रस्त्यात अडकून पडला.
नागरिकांच्या तक्रारीची दाखल घेतली जात नसल्याने नगरपालिका ठेकेदार तसेच संबंधित लोकांना अभय देण्याचे काम तर करत नाहीये ना? असा सवाल नागरिकांतर्फे विचारला जात आहे. नगरपालिका या रस्त्याची अवस्था केव्हा सुधारेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. हा रस्ता निष्पाप लोकांचा बळी घेण्याअगोदर प्रशासन जागी होईल का? असा सवाल नागरिकांमार्फत उपस्थित केला जात आहे.