माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था :- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं असून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी सलग दोनवेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. त्यांनी 2004 ते 2014 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे नेतृत्व केले. त्याआधी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी 1991-96 या काळात अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात भारताने उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारले. या सुधारणांचे प्रमुख शिल्पकार म्हणून मनमोहन सिंग यांना श्रेय दिले जाते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची ओळख अर्थतज्ज्ञ म्हणून देशाला झाली.