अरविंद देशमुख यांची ‘दै. जळगाव तरुण भारत’च्या संचालकपदी निवड

अरविंद देशमुख यांची ‘दै. जळगाव तरुण भारत’च्या संचालकपदी निवड
जळगाव,प्रतिनिधी सर्जना मीडिया सोल्यूशन संचालित ‘दै. जळगाव तरुण भारत’च्या संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अरविंद देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, सचिव संजय नारखेडे, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.अरविंद देशमुख यांनी 2000 ते 2014 या कालावधीत ‘दै. तरुण भारत’च्या पहूर वार्ताहर म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या परखड आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेमुळे स्थानिक तसेच जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवर प्रभावीपणे प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील समस्या आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातील सक्रियता
पत्रकारितेबरोबरच सहकार व औद्योगिक क्षेत्रातही अरविंद देशमुख यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी नुकतीच जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी (व्हा. चेअरमन) निवडून येण्याचा मान मिळवला आहे. तसेच, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.दै. जळगाव तरुण भारतच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर अरविंद देशमुख यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण माध्यम क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
“संघर्षातून मिळवलेले यश अधिक कडसर असते. पत्रकारिता ही माझी ओळख असून, या नव्या जबाबदारीतून ‘दै. जळगाव तरुण भारत’च्या प्रगतीसाठी पूर्ण ताकदीने काम करेन,” अशी प्रतिक्रिया अरविंद देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.