तरुणांना हेरून लग्नाचा ड्रामा, महिलांची टोळी जेरबंद
महा पोलीस न्यूज | ७ मे २०२४ | जिल्ह्यासह राज्यात लग्न न जमणाऱ्या तरुणांना हेरत लग्नाचे आमीष देत नकली लग्न लावून पोबारा करणारी तरुणी, महिलांची गँग जेरबंद करण्यात कासोदा पोलिसांना यश आले आहे. तीन तरुणींचे कासोदा येथील तीन तरुणांसोबत लग्न लावून दिले होते. या लग्नासाठी तीनही मुलांच्या परिवाराकडून एकत्रित ४ लाख १३ हजार रुपये उकळले होते.
बनावट लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या मोना दादाराव शेंडे (२५), सरस्वती सोनू मगराज (२८) दोन्ही रा.रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (२६) रा.पांढुर्णा, मध्य प्रदेश), सरलाबाई अनिल पाटील (६०) आणि उषाबाई गोपाल विसपुते (५०) दोन्ही रा.नांदेड, ता. धरणगाव) या टोळीला अटक करण्यात कासोदा पोलिसांना यश आले आहे. पाचही महिलांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सरला पाटील व उषाबाई विसपुते यांनी २१ एप्रिल रोजी पहिल्या तीन तरुणींचे कासोदा येथील तीन तरुणांसोबत लग्न लावून दिले होते. या लग्नासाठी तीनही मुलांच्या परिवाराकडून एकत्रित ४ लाख १३ हजार रुपये उकळले होते. कासोदा येथे या टोळीने दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाकडून पाच लाख रुपये उकळले मात्र, लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासातून पोलिस या महिलांपर्यंत पोहोचले. साधारण १५ दिवसांपूर्वीच विवाह झालेला असल्याने या तीन महिला कासोदा येथे होत्या. त्यांना अटक करण्यात आली.
असा होता फसवणुकीचा फंडा
जिल्ह्यात गरजू उपवर तरुणांना हेरून त्यांना मध्यस्थांमार्फत मुली दाखवून लग्नासाठी २ ते ५ लाख रुपये उकळण्याचे त्यांचे उद्योग होते. विशेष म्हणजे, यातील तीन तरुणींचे यापूर्वीच लग्न झालेले असून, त्यांना मुलेही आहेत. दरम्यान, या महिलांनी अनेक तरुणांना गंडवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी कासोदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. निलेश राजपूत, सहायक फौजदार रवींद्र पाटील, मनोज पाटील, पो.हे.कॉ. राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्रान पठाण, जितेश पाटील, नितीन पाटील, सविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नागरिकांनी संपर्क साधावा!
फसवणूक करुन विवाह लावणाऱ्या टोळीच्या भुलथापांना बळी न पळता खात्री करुनच लग्ना बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व अशा फसवणुक करण्याऱ्या टोळ्या सक्रिय असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.