गुआनाजुआटोतील उत्सवात अंधाधुंद गोळीबार; १२ ठार, २० जण जखमी

गुआनाजुआटोतील उत्सवात अंधाधुंद गोळीबार; १२ ठार, २० जण जखमी
मेक्सिको (वृत्तसंस्था) – मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यातील इरापुआटो शहरात सेंट जॉन द बाप्टिस्ट यांच्या सन्मानार्थ सुरू असलेल्या उत्सवावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक अंधाधुंद गोळीबार करत उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. या भीषण घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
https://x.com/CorresponsalsMX/status/1937924232593478002/photo/2
ही घटना सायंकाळनंतरच्या सुमारास बारिओ नुएव्हो भागातील अरुंद गल्लीत घडली. डीजेच्या तालावर तरुण–तरुणी नाचत असतानाच अचानक जोरजोरात गोळीबार सुरू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतं की, उत्सवात सहभागी झालेले लोक नाचत असतानाच गोळीबार होताच एकच गोंधळ उडतो आणि लोक सैरावैरा धावू लागतात. काही क्षणांतच परिसरात मृतदेह आणि जखमी पडलेले दिसतात.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इरापुआटो प्रशासनाने घटनेची पुष्टी करत दोषींविरुद्ध कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शीनबाऊम यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून याची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही गुआनाजुआटो राज्य हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध राहिलं आहे. गेल्या महिन्यात याच राज्यातील एका कॅथलिक चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता.
सध्या गुआनाजुआटो परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.