मोती माता यात्रेला सुसंस्कृत सांस्कृतिक अधिष्ठान

मोती माता यात्रेला सुसंस्कृत सांस्कृतिक अधिष्ठान
चैतन्य तांड्यात तमाशाला फाटा; समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांनी यात्रेला नवे स्वरूप
चाळीसगाव प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत चैतन्य तांडा येथे बंजारा समाजाचे दैवत असलेल्या मोती माता यात्रेनिमित्त यंदा सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचा आदर्श पायंडा घालण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चैतन्य तांडा येथे गावकऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित या यात्रेत परंपरागत तमाशाला फाटा देत सुसंस्कृत, समाजप्रबोधनात्मक आणि संस्कारक्षम सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक संदेश गेला असून, चैतन्य तांड्याचा हा निर्णय इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेतील बाल कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, मुकाभिनय, वेलकम साँग, बंजारा नृत्य, देशभक्तीपर गीत, लुंगी डान्स, कोळीगीत तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील आत्मविश्वास, संस्कार आणि कलागुणांनी यात्रेला वेगळाच सुसंस्कृत आयाम प्राप्त झाला. कार्यक्रमाच्या शेवटी जादूगर लक्ष्मण कुमावत यांनी सादर केलेल्या विविध जादूच्या प्रयोगांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या उपक्रमात महिला, युवक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. लोककला, देशभक्तीपर गीत, नृत्य व सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्यप्रयोगांद्वारे सामाजिक एकोपा, सकारात्मक विचार आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा लोकसहभागातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधण्याचा उद्देश चैतन्य तांड्यातील या उपक्रमातून प्रत्यक्षात साकार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष निंबा तवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जव्हार राठोड, सेवानिवृत्त शिक्षक श्रावणभाऊ राठोड, माजी चेअरमन दिनकर राठोड, माजी उपसरपंच आनंदभाऊ राठोड, श्री. संदीप भावसार (४० गाव), पोलीस पाटील लखन राठोड, भाऊलाल चव्हाण, प्रेम राठोड, दिलीप राठोड यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक बेलदार, शिक्षकवृंद गोविंद डुमनर, श्रीम. अनिता राठोड, निलेश पाटील, सुकदेव देवरे, राजेंद्र पाटील, दत्तू पवार, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. मेहुनबारे केंद्रातील सर्व शिक्षक, मान्यवर, यात्रेनिमित्त आलेले पाहुणे, ग्रामस्थ, महिलावर्ग व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणावर प्रेक्षकांनी सुमारे दहा हजार रुपयांचे बक्षीस स्वरूपात कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. भारती महाजन यांनी केले. या उपक्रमामुळे मोती माता यात्रेला केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक व सामाजिक अधिष्ठान मिळाले असून, गावात आनंद, एकता आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले आहे. परिसरात या अभिनव व सुसंस्कृत कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.






