मुख्यमंत्री पदाच्या नावाची आज घोषणा , देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित! ; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार
मुंबई (वृत्तसंस्था) :-मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर असून तेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
अहवालानुसार पक्षाचे वरिष्ठ नेते आधीच त्यांच्या बाजूने आहेत. त्याचवेळी आता त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटप्रमुख एकनाथ शिंदे यांचीही मनधरणी करण्यात आली आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे.
देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यामध्ये मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री या पदांवर सविस्तर चर्चा झाली. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी तयार केल्याचे सांगण्यात येत आहे, तर यापूर्वी शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत हे पद घेण्यास तयार नसल्याचे वृत्त होते.आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, ज्यांना पक्षाच्या हायकमांडने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे, ते दोघेही मुंबईत पोहोचतील. त्यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून आमदार त्यांचा नेता निवडतील. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.