मुक्ताईनगर मुलीची छेडछाड प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. केतन ढाके यांची नियुक्ती

मुक्ताईनगर मुलीची छेडछाड प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. केतन ढाके यांची नियुक्ती
जळगाव: मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे भरलेल्या मुक्ताई यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेडछाड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणी सात जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, अनिकेत भोई या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२८ फेब्रुवारीच्या रात्री कोथळी येथे यात्रेदरम्यान काही टवाळखोरांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेड काढली. या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मंत्रीमहोदयांच्या कुटुंबातील सदस्यासोबतच अशा घटना घडत असतील, तर सर्वसामान्य महिलांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भुसावळ, जिल्हा जळगाव येथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला चालवण्यासाठी अॅड. केतन जयदेव ढाके यांची “विशेष सरकारी वकील” म्हणून नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र कायदा अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती आणि मोबदला) नियम, १९८४ च्या नियम ४४ आणि पोक्सो कायदा, २०१२ च्या कलम ३२ अंतर्गत करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत सात जणांवर गुन्हे दाखल केले असून, अनिकेत भोईला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, महिला सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.