मुक्ताईनगरातील जीवघेण्या खड्ड्याला पत्रकारांकडुन भावपूर्ण निरोप!

मुक्ताईनगरातील जीवघेण्या खड्ड्याला पत्रकारांकडुन भावपूर्ण निरोप!
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी): मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल मुक्ताई पॅलेस समोर असलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले होते. अखेर आज मुक्ताईनगर तालुक्यातील पत्रकारांनी या “मानवतेचा जीव घेणाऱ्या खड्ड्याला” भावपूर्ण निरोप देत अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले.
पत्रकारांनी या ठिकाणी फुलांचा हार अर्पण करून, मेणबत्त्या पेटवत प्रशासनाचे लक्ष वेधले. या प्रसंगी पत्रकारांनी संतप्तपणे सांगितले की, “रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाची उदासीनता हीच अपघातांची खरी कारणे आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत, आणि तरीही संबंधित विभाग गप्प आहे.”
नागरिकांनीही या आंदोलनाचे स्वागत करत तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात तालुक्यातील रस्त्यावरील जीवघेण्या ठिकाणचा खड्डे भरून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील पत्रकार बांधवांकडून करण्यात आली.






