Crime

शेअर मार्केटच्या कर्जावरून आजीवर कुऱ्हाडीने हल्ला; नातवाला अटक

शेअर मार्केटच्या कर्जावरून आजीवर कुऱ्हाडीने हल्ला; नातवाला अटक

धरणगाव (प्रतिनिधी): शेअर मार्केटमधील कर्जाच्या वादातून नातवाने आपल्या ७० वर्षीय आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार करत तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धरणगाव शहरात गुरुवारी (दि. २६ जून) दुपारी घडली. या हल्ल्यात लीलाबाई रघुनाथ विसपुते या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी संशयित नातवाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलाबाई विसपुते (रा. महाबळ, जळगाव) या त्यांच्या मुलीच्या घरी, वैशाली पोतदार (रा. धरणगाव) यांच्याकडे काही दिवसांसाठी मुक्कामी आल्या होत्या. वैशाली यांचा मुलगा तेजस पोतदार हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर कर्ज झाल्याने घरच्यांमध्ये त्याच्यावरून सतत वाद होत होते.

गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तेजस आणि लीलाबाई यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर लीलाबाई झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्या. दरम्यान, तेजसने कुऱ्हाड घेऊन त्यांच्यावर झोपेत असताना हल्ला केला. त्याचा भाऊ अक्षयने त्याला हातात कुऱ्हाड घेऊन जाताना पाहिले होते. तेजसने त्याला “पिंपळाचं झाड तोडायला चाललोय” असे सांगितले होते. काही वेळातच त्याने आजीवर कुणीतरी हल्ला केल्याचा बनाव करत भावाकडे धाव घेतली.

आजीनं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अवस्था पाहून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी लीलाबाई यांच्या नातवाने, उमेश धीरेंद्र विसपुते (रा. महाबळ) यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार तेजस विलास पोतदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button