नायरा पेट्रोल पंप मालकाला लुटणारे २४ तासात गजाआड
महा पोलीस न्यूज | ८ जून २०२४ | मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री तीन हल्लेखोरांनी नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडवत डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करून लुटले होते. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या दरोड्याचा छडा लावत तिघांना अटक केली आहे.
मूर्तिजापूर येथील दिनेश बुब हे शुक्रवारी रात्री त्यांचे मालकीचे नायरा पेट्रोलपंप येथुन चारचाकी वाहनामध्ये बसुन घरी जात होते. पेट्रोल पंपापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर स्मशानभुमीजवळ अनोळखी तीन आरोपीतांनी यांची कार अडवुन कारवर लाकडी दांडयाने बोनेटवर मारले. फीर्यादी हे कार खाली उतरले असता आरोपीतांनी त्यांचे डोळयामध्ये मिरची पावडर टाकुन फीर्यादी यांचे पाठीवर डाव्या बाजुस व डाव्या हातावर गुप्तीने वार करून जख्मी केले.
दरोडेखोरांनी बुब यांचे कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यामध्ये नगदी २ लाख ५०००० रुपये असे कारमधुन जबरीने काढुन घेतले. मोटार सायकलवर बसुन तिघे अनोळखी इसम निघुन गेले. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसात फीर्यादीचे फिर्यादवरून अपराध क २२५ / २४ कलम ३९५, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्रे वेगाने फिरवत तपास सुरु केला होता.
दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून तसेच तांत्रीक माहीतीचे आधारे पोलिसांनी गुन्हयात अनिकेत राजकुमार वर्धट वय २४ वर्ष, सम्यक धनंजय थोरात वय २० वर्ष दोन्ही रा. प्रबुध्द नगर, वडाळी अमरावती, पवन उमेश दहीहंडेकर वय १९ वर्ष रा.श्रीरामनगर मुर्तीजापुर तसेच दोन विधी संर्घषीत बालक यांना वडाळी कॅम्प अमरावती येथुन ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली हीरो कंपनीची पॅशन प्रो मो सा क्रमांक एमएच.२७.डी सी.८४६६, अॅपल कंपनीचा मोबाईल किंमत ७० हजार रुपये आणि नगदी ३१ हजार रोख असा एकुण १ लाख ५१ हजारांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रामनाथ पोपळे साहेब, पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाबाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. भाउराव घुगे, पोलीस उपनि गणेश सुर्यवंशी, पोलीस हवालदार नंदकीशोर टिकार, सुरेश पांडे, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोलीस कॉस्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भूषण नेमाडे, सायबर पो स्टे चे गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.