मनपात ट्रॅप : लाच घेताना लिपिकसह कंत्राटी कर्मचारी रंगेहात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या यशस्वी सापळा कारवाईत जळगाव महानगरपालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. एका संस्थेची अनामत रक्कम परत देण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली होती.
तक्रारदार एका कर सल्लागार संस्थेसाठी काम करतात, त्यांनी एका संस्थेतर्फे जळगावमधील नवीन बसस्थानकावरील आधुनिक सार्वजनिक शौचालयाच्या टेंडरसाठी अर्ज दाखल केला होता. टेंडर मिळाले नसल्याने, टेंडरची ३५,००० रुपये अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेत अर्ज केला. या संदर्भात ते महापालिकेचे लिपिक आनंद जनार्दन चांदेकर यांना भेटले होते.
चांदेकर यांनी अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लगेच दि.१९ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर, एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, लिपिक आनंद चांदेकर यांनी तक्रारदाराकडून ५,००० रुपये मागितले आणि ही रक्कम त्यांचे सहकारी, कंत्राटी कर्मचारी राजेश रमण पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. दोघांनीही ही लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
एसीबीचे नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक दूरध्वनी – ०२५७-२२३५४७७, टोल फ्री : १०६४.





