
राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 (53) वरील मध्यरेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात
खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत प्रगतीचा आढावा
जळगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 (53) वरील तरसोद-पाळधी बाह्यवळण रस्त्यावरील मध्यरेल्वे उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी या उड्डाणपुलाच्या गर्डर बसविण्याचे काम जलद गतीने सुरू आहे.
या प्रकल्पाची खासदार स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्याकडून संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तंत्रज्ञ व कामगारांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीबद्दल प्रशंसा केली.
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, “हा पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल आणि प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. जळगावच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुकर होईल.”
हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीसाठी नव्हे, तर जळगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.