बसमध्ये चढताना विद्यार्थ्याचा मोबाईल चोरी ; जळगाव नवीन बस स्थानकावरील घटना

बसमध्ये चढताना विद्यार्थ्याचा मोबाईल चोरी ; जळगाव नवीन बस स्थानकावरील घटना
जळगाव : नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका विद्यार्थ्याचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २ जुलै रोजी दुपारी घडली असून, त्यामुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक प्रकाश दळवी (वय १८, रा. गुडभेली, ता. मोताळा) हा विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी जळगाव येथे आला होता. नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढण्याच्या तयारीत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून मोबाईल फोन लंपास केला. चोरीची बाब लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.
या प्रकरणी दीपक दळवी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भारती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल व इतर मौल्यवान वस्तूंबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.