रेल्वे अपघातातील मृतदेहाचा उलगडा मोबाईलमुळे; सुरतहून परतलेला वृद्ध घरी पोहोचल्यावर खळबळ

रेल्वे अपघातातील मृतदेहाचा उलगडा मोबाईलमुळे; सुरतहून परतलेला वृद्ध घरी पोहोचल्यावर खळबळ
धरणगाव प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे घडलेल्या रेल्वे अपघातात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख भ्रमणध्वनीच्या साहाय्याने पटली. सुरुवातीला मृत व्यक्ती पाळधी गावातील असल्याचा समज झाल्याने गावात शोककळा पसरली होती. मात्र, नंतरचा प्रसंग सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला.
काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे अपघातात एक अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्या व्यक्तीचे कपडे आणि अन्य खुणा पाहून ती पाळधी गावातील असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे तातडीने जखमी व्यक्तीला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आणि त्यांच्या मुलाला पुण्याहून बोलावण्यात आले.
मुलगा घरी पोहोचण्याआधीच मृतदेह शववाहिकेतून गावात आणण्यात आला. मात्र, याच दरम्यान खळबळजनक घटना घडली. जे मृत समजले जात होते, ते वृद्ध सुरतहून पाळधी येथे पॅसेंजर गाडीने परतले आणि घरी येताच समोर अंत्यसंस्कारासाठीची गर्दी पाहून हैराण झाले. त्यांनी आपल्या नातेवाईकांना आपण जिवंत असल्याचे सांगताच गावात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की, मग मृतदेह नेमका कोणाचा आहे? यावेळी अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन खराब स्थितीत आढळला. त्यातील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्ती पथराड गावचे ज्ञानेश्वर अर्जुन पाटील असल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरा त्यांच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेह दाखविण्यात आला असता त्यांनी त्यांची ओळख पटवली.
काल सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.