प्रत्येक मताचे मूल्य जाणणारी यंत्रणा, रात्रीचा दिवस करते तेव्हा….!!
जळगाव : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाली. निवडणुक काळात अनेक शासकिय कर्मचारी हे दिवस रात्र, वेळेची पर्वा न करता मतदान प्रक्रिया सुरळित पार पाडावी याकरिता कार्यरत होते.
मतमोजणीच्या एक दिवसाआधी 22 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता, जळगाव जिल्हा पोस्टल मतपत्रिका केंद्राला भंडारा जिल्ह्यातून 127-इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाली. 127-इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका जळगावमधील 12-भुसावळ विधानसभा मतदारसंघातील मतपत्रिकांमध्ये चुकून आढळून आली होती.
याप्रसंगी मतमोजणीसाठी ही मतपत्रिका इगतपुरी मतदारसंघात असणे आवश्यक होते. यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमधील 127- इगतपुरी मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर मतपत्रिका पोहोचवण्याचे काम जिल्ह्याच्या पोस्टल बॅलेट अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या जयश्री माळी यांना देण्यात आले. जयश्री माळी यांना राज्याच्या प्रोटोकॉल विभागाकडून एक इनोव्हा क्रिस्टा वाहन, एक पोलीस रक्षक आणि रात्रभर 250 किमी प्रवासासाठी एक सरकारी ड्रायव्हर प्रदान करण्यात आला होता.
जयश्री माळी आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी यांनी रात्रभर प्रवास करत सकाळी ८ वाजेपूर्वी मतपत्रिका नाशिकच्या मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आणि तेथील नियुक्त अधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्या. या संपूर्ण ऑपरेशनचे नियंत्रण जिल्हा नियोजन व देखरेख युनिटचे श्री मिलिंद बुवा, पोलीस हवालदार श्री सौरभ कोलते, भुसावळ विधानसभा मतदार संघाचे पोस्टल बॅलेट इंचार्ज श्री अमित दुसाने, पोलीस चालक श्री. विजय चौधरी यांनी केले. निवडणूक यंत्रणेला निवडणुकीत युद्ध गतीने काम करावे लागते ही बाब मात्र या घटनेतुन पुन्हा अधोरेखीत झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व टीमचे कौतुक केले.