जळगाव जिल्ह्यातून पूरग्रस्तांसाठी अमृतसरला मदत

जळगाव: भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या (जळगाव शाखा) वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमृतसर (पंजाब) येथे मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मदतसाहित्याने भरलेल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या उपक्रमातून गणेशोत्सवातील एकी, काळजी आणि करुणेची भावना दिसून आली. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या मदतीमुळे ‘एकजुटीची ताकद’ सिद्ध झाली आहे.
या मदतीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे दान केले आहे. पाठवण्यात आलेल्या साहित्यात बादल्या, ताडपत्री, ब्लँकेट्स, भांडी, साड्या, डासजाळ्या, बिस्किटे, खाद्यतेल, मीठ, चिक्की, लाडू, चटया, वह्या, गूळ, शेंगदाणे, पाण्याचे मग, नमकीन आणि चप्पल अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय, सोलर टॉर्च, टूथपेस्ट, ब्रश, साबण, टॉवेल्स आणि सोलापुरी चादरी देखील पाठवण्यात आल्या आहेत.
या उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे आणि करुणेमुळे ही मदत शक्य झाली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय भावनेचे मूर्तिमंत उदाहरण या उपक्रमातून दिसून आले आहे.






