पाचोरा-पारधाडे दरम्यान रेल्वेखाली तिघांचा मृत्यू; आत्महत्येचा प्राथमिक संशय

पाचोरा-पारधाडे दरम्यान रेल्वेखाली तिघांचा मृत्यू; आत्महत्येचा प्राथमिक संशय
पाचोरा | प्रतिनिधी – पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान काल (५ मे) सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका तरुण पुरुषासह महिला आणि सुमारे अडीच वर्षांच्या बालकाने धावत्या रेल्वेसमोर झोकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भीषण घटनेत तिघांचाही मृत्यू जागीच झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अयोध्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती दिली की, पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक ३७६/१९ जवळ एक पुरुष, महिला आणि बालक पटरीवर आले आणि क्षणार्धात ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळले. तिघांचे मृतदेह तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
आज (६ मे) मृतांपैकी पुरुषाची ओळख राजेंद्र निंबा मोरे (वय २२, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) अशी पटली आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या महिलेसह बालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेची नोंद पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करत आहेत. या तिघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगाने चौकशी सुरू आहे.