पाचोरा-जामनेर तालुक्यात पावसाचा कहर; नद्या नाल्यांना पूर ! (पहा व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि जामनेर तालुक्यात हाहाकार माजवला आहे. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. परिणामी दगडी नदीसह परिसरातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला असून सातगाव डोंगरीकडून मराठवाड्याकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे.
वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री यांसह आसपासच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली.
जामनेर तालुक्यातील नेरी-चिंचखेडा परिसरातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून वाहतुकीचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ अडचणीत आले आहेत.
या पुराच्या पाण्यात शेकडो जनावरे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या गावांमध्ये अजूनही पाणी ओसरण्याचे चित्र नसल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.






