शिरसोदेतील अवैध वाळू वाहतुकीने घेतला १५ वर्षीय मजुराचा बळी !

शिरसोदेतील अवैध वाळू वाहतुकीने घेतला १५ वर्षीय मजुराचा बळी !
पारोळा प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोदे येथील बोरी नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीदरम्यान एका १५ वर्षीय अल्पवयीन मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहाटे तीन वाजता घडलेल्या या घटनेत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने धडक दिल्याने देवा उर्फ गौतम गोकुळ भिल या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिकांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
.शिरसोदे (ता. पारोळा) येथील बोरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असताना MH 19 CY 1236 क्रमांकाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली मागे घेत असताना ही दुर्घटना घडली. ट्रॅक्टर चालक अजय देवमन भिल याने ट्रॉली रिव्हर्स करताना १५ वर्षीय देवा उर्फ गौतम भिल याला जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. चालकाने जखमीच्या भावाला घटनेची माहिती दिली, परंतु बहादरपूर सरकारी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर चालक अजय भिल याला वाहनासह अटक केली. तसेच ट्रॅक्टर मालक समाधान शंकर पाटील (रा. शिरसोदे, ता. पारोळा) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “एका कुटुंबातील आधार असलेला लहान मुलगा अवैध वाळू वाहतुकीमुळे गमावला. प्रशासन झोपले आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला.पारोळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक बिनधास्तपणे सुरू असून, महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून ही वाळू माफियांची मनमानी थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,” अशी चेतावणी गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, देवाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.