रिक्षात प्रवाशांना लुटले, एमआयडीसी पोलिसांनी दोघांना पकडले
महा पोलीस न्यूज | १५ मार्च २०२४ | शहरातील रेमंड चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या दोन प्रवाशांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावून घेतल्याची घटना घडली होती. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षादेखील जप्त करण्यात आली आहे.
औद्योगिक वसाहतीत काम करणारे निलेश शिलारे आणि शिवा शिलारे हे दोघे भाऊ दि.९मार्चच्या मध्यरात्री आपल्या मुळ गावी जाण्यासाठी रेमंड चौकात रिक्षाची वाट बघत होते. त्यावेळी आलेल्या एका रिक्षात बसून दोघे रेल्वे स्टेशनला जाण्यास निघाले असता रिक्षाचालकाने दोघांना रेल्वे स्टेशनला न नेता खेडी पेट्रोल पंपाजवळ घेऊन गेला. याठिकाणी रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराने दोघा प्रवासी भावांना शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले.
घडलेल्या प्रकरणानंतर निलेश शिलारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दोघांना क्रमाक्रमाने ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, निलेश गोसावी, दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींनी केली आहे.