धक्कादायक : जळगावकर पोलीस अधिकाऱ्याने मुंबईत संपविले जीवन
महा पोलीस न्यूज | २८ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मुंबईतच्या वाकोल्यात पोलीस वसाहतीच्या टेरेसवर गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रल्हाद बनसोडे वय – ४२ असे आत्महत्या केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. पंधरा दिवसात दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने जीवन संपविल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनमधील ४२ वर्षीय सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांची जळगावमधून मुंबईत बदली झाली होती. त्याठिकाणी कलिना बीडीएस पोलीस स्टेशनला बॉम्ब शोध पथकात ते कार्यरत होते. पोलीस वसाहतीच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांचे कुटुंब राहत होते.
मंगळवारी पाच वाजण्याच्या सुमारास वसाहतीच्या टेरेसवर जाऊन त्यांनी जीवन संपवले. इमारतीचा वॉचमेन अचानक टेरेसवर गेल्यानंतर बनसोडे यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक नागरिक आणि वाकोला पोलिसांनी ही माहिती दिली. प्रल्हाद बनसोडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, बनसोडे हे काही आजारामुळे नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे.