भेदभाव, जातीपातीचे राजकारण कधीही केले नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | मेरे पास ना दादा की दौलत हैं ना बाप की दौलत है, जो हैं वो आपके आशिर्वाद की दौलत हैं या शेरने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली. जळगाव जिल्ह्यात अडीच लाख मताधिक्याने आमची जागा निवडून आली यावर विश्वास बसत नाही. माझ्या मंत्रिपदाची ८ वर्षे संपत आहेत. मी कुणाचे काम केले, कुणाचे नाही हे माहिती नाही मात्र भेदभाव, जातीपातीचे राजकारण केले नाही. पालकमंत्री असताना ५ वर्षाच्या काळात कोणत्याही पक्षाचा असो त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला. एका ओट्यावरून मी वाढदिवसाला सुरुवात केली आज हे मैदान देखील अपूर्ण पडत आहे, असे पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील म्हणाले.
पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील पुढे म्हणाले की, राजकारणात सर्वात मोठी ताकद जनसंपर्क आहे. तुम्ही कुणाच्या घरी गेले तर लोक तुमच्यासाठी उभे राहतील. लाडली येथून ५ घरे घेऊन माझे वडील इथं आले, गावाने भरभरून प्रेम आम्हाला दिले. अशी कोणतीच निवडणूक नाही जिथे ८० टक्क्यापेक्षा अधिक मते पाळधी गावाने आम्हाला दिली नाही. जळगाव जिल्हा भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार. लोकसभेला १० पैकी ८ लोक मशाल सांगत होते मात्र निकाल पाहून असे वाटतंय लोकांनी काम त्यांचे केले मात्र मत आपल्याला दिले. जळगाव ग्रामीणने लोकसभेत ६३ हजारांचे मताधिक्य दिले. राज्यात आमच्या अनेक जागा कमी झाल्या तरी जळगाव जिल्ह्याने महायुतीचे नाक राखले. महाराष्ट्र, उत्तरप्रदेशात आम्ही काहीसे कमी पडलो मात्र देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होतील, असे ते म्हणाले.
ना.पाटील पुढे म्हणाले, मी कार्यकर्त्याला नेहमी मदत करत नसेल मात्र जेव्हा वेळ येते तेव्हा मी धक्का देतो. कार्यकर्त्याचे कोणतेही काम असो मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. आज २ रुग्णवाहिका घेतल्या. धरणगाव, पालधी, असोदा, म्हसावद येथे रुग्णवाहिका आहेत. यावर्षी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत दीड लाख वह्या वाटप केल्या जाणार आहे. अपंगांना ५०० दुचाकी दिल्या. किर्तनकारांना भजनाचे साहित्य दिले. आम्ही केवळ रस्ते, गटारीचे काम करत नाही तर आरोग्य, सार्वजनिक जीवनासाठी देखील काम करतो आहे. मतदारसंघातील छायाचित्रकारांचा विमा उतरवला. जनतेसाठी मीच जिल्हाप्रमुख आणि मुख्यमंत्री आहे. कोणतेही काम करण्यासाठी आमच्याकडेच यावे लागते आणि इथंच त्यांचे काम होते, असे ते म्हणाले.
ना.गुलाबराब पाटील पुढे म्हणाले की, मुस्लीम आणि दलित मतदारांनी मतदान केल्यामुळे उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा आल्या आहेत. जेव्हा ते हात काढून घेतील तेव्हा तुमच काय होईल, हे सांगता येत नाही. आम्ही ४१ आमदारांनी मतदान केले म्हणून संजय राऊत खासदार झाले. मी तर खुले आव्हान दिले होते जळगावातून निवडणूक लढवून दाखवा. स्व.बाळासाहेब ठाकरे सांगायचे ज्यांच्या दारी सर्वात जास्त चपला, बूट असतात तोच खरा श्रीमंत असतो. बांद्रामध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मतदान केलं. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढला त्याला त्यांनी मत दिले, त्यापेक्षा आम्ही बरे.. आम्ही उठाव केला, असे ना.पाटील यांनी सांगितले.
ना.पाटील पुढे म्हणाले की, मी निधी देताना कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाला निधी दिला. लोकांना लोकसभा निवडणुकीत भडकावण्याचे काम करण्यात आले. आमच्या निवडणुका तुमच्या भरवशावर आहेत. मला खात्री आहे की आजची गर्दी पाहून मी पुढील ३ महिने तरी थांबणार नाही. मी स्वतःला धन्य समजतो, तुम्ही माझ्यावर आजवर प्रेम केले. आपण इतक्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी आपले आभार मानतो, असे म्हणून त्यांनी भाषण संपविले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.५ जून रोजी पाळधी येथील बाजारपेठ मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, शिवसेना आमदार किशोर पाटील, आ.राजुमामा भोळे, माजी आ.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, माजी जि.प.सदस्य गोपाल चौधरी, बाजार समिती सभापती गजानन पाटील, भाजप जेष्ठ नेते सुभाष अण्णा, ओबीसी भाजप अध्यक्ष संजय महाजन, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, मुकुंद नन्नवरे, संजय पाटील, मोहन पाटील, मोती आप्पा, राजेंद्र पाटील, गजानन बापू, विजय महाजन, विलास महाजन, पप्पू भावे, जनार्दन आप्पा, नाना सोनवणे, नंदलाल पाटील, मुकुंद सपकाळे, ज्ञानेश्वर महाजन आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला ना.गुलाबराव पाटील यांच्या स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्हा पालकमंत्री कार्यकाळात करण्यात आलेल्या कार्याची चलचित्रफीत दाखवण्यात आली. सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले. जिल्ह्यातील सर्वपक्षीय मान्यवरांनी भाषणात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना मुकुंद नन्नवरे यांनी केली.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, भाऊंच्या वाढदिवसाचा मी २५ वर्षापासून साक्षीदार आहे. जनतेची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. एक नेता, एक मैदान आम्ही पहिल्यांदा पहातो आहे. गावाची आपल्यामागे खूप मोठी साथ आहे. गावाच्या पुण्याईने आपण इथपर्यंत पोहचले. गद्दार आणि गद्दारी हे विषय याठिकाणी काढू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जनतेने मान्य केले असून ५०% खासदार निवडून दिले आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे ८ पैकी २ खासदार जळगाव जिल्हयाने निवडून दिले. आम्ही सर्व चित्र विसरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक पाऊल पुढे होतो.
आ.सुरेश भोळे म्हणाले की, आज आपल्या सर्वांची वज्रमूठ बांधली गेली आहे. ना.गुलाबराव पाटील यांच्या २०२४ च्या विजयी सभेची ही सुरुवात आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने स्मिताताई खासदार झाल्या. येणाऱ्या काळात विकासाचे जे-जे कार्य असेल ते करण्याचा प्रयत्न आपले मंत्री करतील, असे आ.भोळे म्हणाले.
माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, शेतकरी जशी पावसाची वाट बघतो तसे सर्व कार्यकर्ते गुलाबभाऊंच्या वाढदिवसाची वाट बघतो. तुमच्या वेळेला फळ असतात आमच्या वाटेला देखील येऊ द्या, असा टोमणा त्यांनी आ.भोळे यांना लगावला. जिल्ह्यात विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम गुलाबराव पाटलांनी केले आहे. अनेकांचे अश्रू त्यांनी पुसले आहे. आमच्या चोपडा तालुक्यावर गुलाबराव पाटील यांचे विशेष प्रेम आहे. स्मिताताई वाघ निवडून आल्यावरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे ते म्हणाले.
खा.स्मिताताई वाघ म्हणाल्या की, आजचे सगळे भाऊ नसते तर मी खासदार नसते. तुम्ही पायाला भिंगरी लावून सर्वत्र फिरले. जळगाव ग्रामीणने मला ६३ हजारांचे मताधिक्य दिले हे खूप आहे. गुलाबभाऊंनी पाणीवाले बाबा म्हणून अनेक गावांना पाणी दिले. एकेका गावाला कोट्यवधीची कामे आपण दिले. गुलाबभाऊ सर्वांचे भाऊ आहेत. येणाऱ्या ४ महिन्यात निवडणूक असून आम्ही देखील आपल्यासाठी धावून येऊ असा शब्द आम्ही देतो असे म्हणून सर्वानी नाराजीचा सूर सोडावा असे आवाहन त्यांनी केले.