जळगाव भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 पासून प्रचार बंद झाला आहे. जळगाव जिल्हयाकरिता मतदानपुर्वीच्या आदल्या दिवसापासुन म्हणजेच 18 नोव्हेंबर पासुन ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत म्हणजेच 21 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर प्रतिबंध असणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
दरम्यान कडक आचारसंहितेच्या काळात शुल्लक कारणावरुन देश विघातक कृत्य करणारे समाज कंटक, जातीय गुंड हे याचा फायदा घेऊन किंबहुना समाजात तेढ निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी किरकोळ कारणावरुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन जळगाव जिल्हयात 19 नोव्हेंबर चे 00.01 वाजेपासून ते 3 डिसेंबरच्या 24.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
याकाळात शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यांसाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरण्यावर बंदी असणार आहे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ अथवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार, जमा करणे, आणि बरोबर नेण्यास बंदी आहे.
तसेच कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक. प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिक रित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक, इ. लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी असणार आहे. यात केवळ ज्यांना हातात लाठी किवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही. असे आदेशात म्हटले आहे.
पोलीस अधिक्षक यांच्या पूर्व परवानगी शिवाय पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी असणार आहे.
हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न मिरवणुका तसेच धार्मिक मिरवणुका यांना लागु राहणार नाही. तसेच हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू राहणार नाही आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भिमराज दराडे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहेत.