मोठी बातमी ; भाजप खासदार पडून जखमी झाल्याने संसदेत वादंग ; राहुल गांधींनी ढकलल्याचा आरोप (पहा व्हिडिओ)
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ):- संसद भवन येथे आज मोठा वाद निर्माण झाला असून राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळे भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी हे जखमी झाल्याची घटना घडली असून यामुळे संसदेत वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान काँग्रेसने राहुल गांधी यांनी धक्का दिलाचा आरोप फेटाळून लावला आहे.
सारंगी यांच्या म्हणण्यानुसार, ते संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभे होते. याचवेळी राहुल गांधींनी त्यांना धक्का दिला, ज्यामुळे दुसरा खासदार त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत सारंगी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.
https://twitter.com/i/status/1869620697074668006
यावर राहुल गांधी यांनी भाजप खासदारांवर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, “मी संसद भवनाच्या मकर द्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. भाजप खासदारांनी मला रोखले, धक्काबुक्की केली आणि धमकावले. आम्हाला संसदेत प्रवेशाचा अधिकार आहे, मात्र भाजप खासदारांनी हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने या प्रकरणात सारंगी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, “हा भाजपचा शुद्ध राजकीय डाव आहे. त्यांनीच राहुल गांधींवर आरोप करण्यासाठी हे नाट्य रचले आहे. वास्तविक पाहता, भाजप संविधानावर हल्ला करत आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा अपमान करत आहे.”
संसदेत आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या एका विधानामुळे वातावरण तापले होते. डॉ. आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसने विरोध प्रदर्शन केले होते. त्यातच सारंगी यांची जखमी होण्याची घटना घडल्याने वाद अधिक तीव्र झाला.