जळगावात मोबाईल चोरट्यांवर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई; दोघांना अटक, पाच महागडे मोबाईल जप्त

जळगावात मोबाईल चोरट्यांवर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई; दोघांना अटक, पाच महागडे मोबाईल जप्त
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर आणि रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव रेल्वे पोलीस दलाने (आरपीएफ) गुरुवारी (२६ जून) सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत दोन सराईत मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती आरपीएफकडून देण्यात आली.
सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरट्यांचा पर्दाफाश
१७ जून रोजी भिकन नवल पाटील यांचा १.३० लाख रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल बडनेरा-नाशिक मेमो एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढताना जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चोरीला गेला होता. याप्रकरणी जीआरपी भुसावळ येथे गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेची दखल घेत आरपीएफ निरीक्षक अमित कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजचे सखोल विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान एका संशयित चोरट्याची ओळख पटली. त्यानंतर विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पाळत ठेवून संशयितासह त्याच्या साथीदाराला अटक केली.
आरोपींकडून पाच मोबाईल चोरीची कबुली
चौकशीदरम्यान अटकेतील दोन्ही आरोपींनी जळगाव शहर बसस्थानकातून आणखी तीन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या पाच मोबाईल्सची एकूण किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. अटकेतील आरोपींची नावे अशी: शेख इमरान शेख गुफरान (वय २२, रा. मालेगाव) आणि शेख अश्फाक शेख मुस्ताक (वय ३०). शेख इमरान याला पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलिसांकडे, तर शेख अश्फाक याला जीआरपी भुसावळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
कारवाईत सहभागी पथक
या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक मनोज सोनी, एएसआय शिवपूजन सिंग, कॉन्स्टेबल पंकज वाघ, विनोद जेठवे आणि मनोज मौर्य यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.