रमजानचा महिना बंधुभाव, सौहार्द वाढवतो : अन्नपूर्णा सिंग

महा पोलीस न्यूज | ६ एप्रिल २०२४ | रमजानचा महिना आपापसात बंधुभाव आणि सौहार्द वाढवतो, ज्यामध्ये सर्व वर्ग, जातीचे लोक एकत्र बसून उपवास सोडतात. यामुळे राष्ट्रीय एकात्मता मजबूत होते, तर समाजात परस्पर बंधुभाव आणि प्रेमही वाढते असे प्रतिपादन आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी केले.
रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक ऐक्य, सर्वधर्म समभाव इफ्तार पार्टी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मौलाना गयासुद्दिन, कपिल महाराज, मौलाना नजर, हरीश गणवनी, पोलीस निरीक्षक डॉ.प्रदीप जयस्वाल उपस्थित होते.
सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंग पुढे म्हणाल्या की, रमजानचा हा तिसरा खंड सुरू असून लवकरच ईदचा सणही येणार आहे. हा सण साजरा करण्यासाठी सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी शांती, एकता व एकत्रितपणे हा सण साजरा करावा. रमजान काळात पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण दक्षता घेण्यात येईल. शांतता बिघडविणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसंगी मौलाना गयासुद्दीन, मौलाना नजर, कपिल महाराज यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.प्रदीप जैस्वाल यांनी नागरिकांनी आगामी ईद व इतर सणात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोचवणे आणि समाजासाठी उपयुक्त असे सर्जनशील कार्य करण्याचे आवाहन केले.
प्रसंगी शेख घियास, युसूफ खान, अब्दुल रफिक, अयुब सदस्य, सादिक सदस्य, शेख शफी, माजी शहराध्यक्ष हरीश गनवाणी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महमूद शेख, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर महाजन, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, अरुण शिंदे, सुधाकर महाजन, दिलीप कांबळे, काझी साहेब, ई.जे.महाजन आदी उपस्थित होते.