
महा पोलीस न्यूज । दि.२६ जानेवारी २०२६ । माणसाच्या अंतरी दया आणि करुणा नांदत असतील, तर त्याच्या कृती आपोआप लोककल्याणाच्या दिशेने वाहू लागतात. शब्दांपेक्षा कृती मोठी ठरते आणि सेवा हीच साधना बनते. रणजीत सखाराम गव्हाळे यांचा जीवनप्रवास पाहिला, की माणुसकी केवळ सांगितली जात नाही, तर ती जगली जाते, याची प्रचिती येते.
संवेदनशील मनाचे असलेले रणजीत सखाराम गव्हाळे हे तितकेच कृतीशील आणि समाजाशी नाळ जुळवून ठेवणारे व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक माणसामध्ये वेदना असतात आणि त्या वेदनांवर फुंकर घालण्याची जबाबदारी आपलीच आहे, ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून ठळकपणे दिसून येते. मदतीसाठी पुढे सरसावणे, गरजूंना आधार देणे आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अविरत सेवा करणे, हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे.
दिनांक २४ एप्रिल २००७ रोजी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी रणजीत यांनी रक्तदानाची सुरुवात केली. त्या दिवसापासून आजतागायत वर्षातून चार वेळा नियमितपणे रक्तदान करत त्यांनी तब्बल ७५ वेळा रक्तदान पूर्ण केले आहे.
सेवा आणि राष्ट्रभावना यांचा सुंदर संगम साधत आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रणजीत गव्हाळे यांनी आपले ७५ वे रक्तदान, तर सौ.अंकिता यांनी १६ वे रक्तदान पूर्ण केले. हा क्षण केवळ आकड्यांचा नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा आणि देशभक्तीच्या भावनेचा साक्षीदार ठरलेला आहे. “रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर ती माणुसकी जपण्याची एक प्रभावी साधना आहे.” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
रणजीत यांचे वडील सखाराम गव्हाळे यांनी सैन्यदलातून देशसेवेचे संस्कार दिले. तोच वारसा रणजीत यांनी आरोग्यसेवा आणि समाजकार्याच्या माध्यमातून पुढे नेला. रणजीत आणि सौ.अंकिता यांनी समाजकार्य आणि चिकित्सक मानसशास्त्र या शाखांचे शिक्षण घेत असतांना “माणूस वाचवणं हाच खरा धर्म” ही भावना त्यांच्या मनात अधिक दृढ झाली.
रणजीत हे गेल्या नऊ वर्षांपासून अर्थात एप्रिल २०१६ पासून आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. सहा वर्षे ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे समुपदेशक म्हणून त्यांनी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. गेल्या तीन वर्षांपासून ते जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे चिकित्सक मानसशास्त्रज्ञ म्हणून रुग्णसेवा करीत आहेत. आजारासोबतच भीती, नैराश्य आणि मानसिक ताण तणाव यांच्याशी लढणाऱ्या रुग्णांसाठी ते खऱ्या अर्थाने आधारवड ठरले आहेत.
पुढे सन २०१६ मध्ये रणजीत आणि सौ.अंकिता यांच्या आयुष्याच्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या. समान विचार, सकारात्मक दृष्टीकोन आणि माणुसकीवर असलेल्या नितांत विश्वासाच्या बळावर, एकमेकांच्या हातात हात देत या दोघांनी सहजीवनाच्या सुंदर प्रवासाला सुरुवात केली. विवाहानंतर रणजीत यांच्या सेवाप्रवासाला नवे बळ मिळाले, तर अंकिता या प्रवासातील खंबीर साथीदार ठरल्या. योगायोगाने दोघांचाही रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ आणि विचारही तितकेच सकारात्मक.
रणजीत यांच्या रक्तदानाच्या वाटेवर सौ.अंकिता यांनीही न थांबता पावले टाकली. आजपर्यंत अंकिता यांनी १६ वेळा रक्तदान करून दातृत्वाचा वारसा पुढे नेला आहे. तसेच या दोघांनी मिळून ‘कपल डोनेशन कॅम्पेन’ देखील सुरू केले. विशेषतः थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठा मिळावा, यासाठी हे दाम्पत्य रात्रंदिवस कार्यरत असतात. आजवर हजारो रुग्णांना रक्त मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
गव्हाळे दाम्पत्याची सेवा ही वेळेच्या चौकटीत अडकणारी नाही. २४ तास आणि वर्षातील ३६५ दिवस गरजूंसाठी सदैव उपलब्ध राहणे, हीच त्यांच्या जीवनशैलीची ओळख आहे. इतकेच नव्हे तर या दोघांच्याही भ्रमणध्वनी क्रमांकाचे शेवटचे पाच अंकही ‘२४३६५’ असणे हा जणू त्यांच्या अविरत सेवाभावाचा योगायोगाने मिळालेला ठसा आहे.
रणजीत आणि सौ.अंकिता यांच्या सेवायज्ञाला त्यांच्या जुळ्या कन्या देवश्री आणि पद्मश्री यांच्यामुळे एक भावनिक अर्थ मिळाला आहे. या आपल्या लेकींचा वाढदिवस “सेवेचा दिवस” म्हणून साजरा करण्याचा त्यांचा निर्णय म्हणजे पुढील पिढीला दिलेला माणुसकीचा सुंदर संस्कार आहे.
कोरोना महामारीच्या काळात रणजीत गव्हाळे यांचे कार्य अधिक ठळकपणे समाजासमोर आले. जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे रुग्णसेवा करीत त्यांनी रुग्णांमध्ये आशा आणि आत्मविश्वास निर्माण केला होता. या सेवेसाठी रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स, जळगाव यांच्या वतीने त्यांना “हार्ट ऑफ गोल्ड” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच चाळीसगाव कोविड सेंटरमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी त्यांचा “देवदूत” म्हणून गौरव केला होता. कोरोना काळात प्रचंड सकारात्मक शक्ती देणारा देवदूत असा त्यांचा उल्लेख आजही केला जातो.
आरोग्य सेवेबरोबरच सामाजिक प्रबोधन हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक, सामाजिक आणि मानसिक बदल या विषयावर विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ते समुपदेशन कार्यशाळा घेतात. किशोरवयीन मुलींसाठी “कळी उमलतांना” या विषयावर मार्गदर्शन करून त्या वयातील प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याचे कार्य ते करीत आहेत.
रणजीत हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगावचे ॲन्युअल असोसिएट असून ज्युनिअर व युथ रेडक्रॉस समितीचे सदस्य, रेडक्रॉस रक्तकेंद्र समितीचे सदस्य तसेच दिव्यांग पुनर्वसन समितीचेही सक्रिय सदस्य आहेत.
तत्पर सेवा आणि आपुलकीचे दोन शब्द, हेच या दाम्पत्याचे खरे वैशिष्ट्य आहे. गरजूंना केवळ मदतच नाही, तर समजून घेणारा संवाद, धीर देणारी उपस्थिती आणि माणुसकीची उब देणे, हे त्यांच्या सेवेचे खरे स्वरूप आहे. संवेदनशील मन, निस्वार्थ वृत्ती आणि प्रत्येक अडीअडचणीला धावून जाण्याची तयारी, हे गुण रणजीत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आत्मा आहेत. गव्हाळे दाम्पत्याचा हा सेवाप्रवास समाजाला एकच ठाम संदेश देतो की “माणुसकी अजून जिवंत आहे आणि ती जपणारे हात आजही समाजात आहेत.”
– धनंजय भास्कर कोल्हे
असोदा, ता.जि.जळगाव
मोबाईल :- 9049584444





