स्विफ्ट कारची बैलगाडीला धडक, शेतकरी गंभीर जखमी

महा पोलीस न्यूज । विजय माळी । भडगाव-चाळीसगाव मार्गावर कोठली फाट्याजवळील हॉटेल वैभवसमोर एका भरधाव स्विफ्ट कारने (एम.एच.०२.बी.आर.१६०१) बैलगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीस्वार विजय धनराज पाटील (वय ४५, रा. कोठली, ता. भडगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत, तर बैलगाडीचे आणि बैलांचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी जखमीचे काका रवींद्र दौलत पाटील (वय ४९, रा. कोठली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारचालक सुधीर कुमार नारायण पाटील (रा. निगडी, पुणे) यांच्या विरोधात भडगाव पोलिसांत गुन्हा (गु.र.नं. २६६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (४), आणि ३२५ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक सुधीर कुमार पाटील हा आपली कार भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवत होता. त्याने पुढे असलेल्या विजय पाटील यांच्या बैलगाडीला मागून धडक दिली, ज्यामुळे विजय पाटील गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी विजय पाटील यांना तात्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी चाळीसगाव, तेथून धुळे आणि नंतर नाशिक येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संजय पाटील करत आहेत.