रावेरात गिरीश महाजनांचा ‘देशमुखी’ डाव यशस्वी!
महा पोलीस न्यूज । आनंद गोरे । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे अमोल जावळे यांनी दणदणीत विजय संपादित केला आहे. रावेरमध्ये गेल्यावेळी पराभूत झालेल्या भाजपला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. महाजनांनी मतदार संघाची जबाबदारी शिलेदार अरविंद देशमुख यांच्याकडे सोपवली. गल्लोगल्ली प्रचार करून मायक्रो नियोजन करीत त्यांनी आपली खेळी यशस्वी करून दाखवली.
रावेर मतदार संघात यंदा पंचरंगी लढतीचे चित्र दिसून आले होते. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी यंदा निवडणूक न लढता पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपचे स्वर्गीय खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे भाजपच्या तिकिटावरून रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी त्यांचे उमेदवारी जाहीर केली होती. मतदार संघात गेल्या वेळी ४५ हजार मते घेणाऱ्या प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी अपक्ष तर वंचित बहुजन आघाडीतर्फे शमिभा पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्याने या मतदार संघात चुरस वाढली होती.
संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्यदूत आणि जिल्हा दूध संघाचे संचालक असलेले अरविंद देशमुख यांच्यावर रावेर मतदार संघामध्ये भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांच्या निवडीची जबाबदारी सोपवली होती. अरविंद देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत प्रचारासाठी रात्रंदिवस एक केला. त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेत मतदार संघातच ठिय्या मांडून अमोल जावळे यांचा प्रचार केला. ठिकठिकाणी गावात कॉर्नर सभा आणि जाहीर सभांमधून अमोल जावळे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अथक परिश्रम आणि मायक्रो नियोजनामुळे अरविंद देशमुख यांचा अमोल जावळे यांच्या विजयात निश्चितच सिंहाचा वाटा म्हणावा लागणार आहे.