रावेर पोलिसांची दमदार कामगिरी, चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत

महा पोलीस न्यूज | २८ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरी वाढल्या असून त्या संदर्भात चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. रावेर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची विचारणा केली असता तिथेच तो फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तपासात चोरट्याने चोरीच्या ५ दुचाकी काढून दिल्या आहेत. तसेच त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
रावेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली मो.सा.क्रमांक एमएच.१९.सीएस.८८०१ चा शोध घेण्यासाठी गस्तीवर असलेले कर्मचारी पाहणी करीत होते. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी पथकाला रवाना केले. अजय राजु वाघोरे वय-२७ रा.भोर रेल्वे स्टेशन, ता.रावेर हा एक हिरो कंपनीची फॅशन प्रो दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीआर.५२६९ ही फिरवत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यास पथकाने थांबवले. पथकाने चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकीचे कागद पत्रे सादर न करता त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याची उशिरापर्यंत चौकशी करता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भुसावळ येथुन चोरुन आणल्याची कबुली दिली आहे.
भोर व रसलपुर ही गावे जवळ जवळ असल्याने मोटार सायकल एमएच.१९.सीएस.८८०१ हि सुध्दा चोरी केलेली असल्याचा संशय बळावत असल्याने त्याची अटक पुर्व वैदयकिय तपासणी करुन त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात अजय वाघोरे याने त्याच्या ताब्यातील आणखी ४ दुचाकी काढून दिल्या. पाचही दुचाकींचा जप्ती पंचनामा करण्यात आला आहे. तसेच यापुर्वी देखील अजय वाघोर याचे विरुध्द उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे मोटार सायकल चोरी संदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक सुरेश मेढे, समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, सुकेश तडवी, विकार शेख यांनी केली आहे. संशयिताकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे.