
जळगाव प्रतिनिधी I स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत ४ लाख ५० हजार रुपये रोख रकमेसह दरोड्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींना जेरबंद केले आहे. दरोड्याचा हा गुन्हा ९ सप्टेंबर रोजी कामयानी रेल्वेतील प्रवाशाला मारहाण करून लुटल्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती जीएस ग्राऊंड परिसरात संशयास्पद हालचाली करत आहेत.
या माहितीच्या आधारावर, पोउपनि सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पथकाने चार संशयितांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या विना-क्रमांकाच्या मोटारसायकलला लावलेल्या पिशवीची तपासणी केली असता, त्यात रोख रक्कम आढळली.
आरोपींची ओळख आणि कबुली
आरोपींना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले असता त्यांनी आपली नावे किरण पंडित हिवरे (रा. भातखेडा, रावेर), अजय सुपडू कोचुरे (रा. खिडर्डी, रावेर), हरीश अनिल रायपूरे (रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर) आणि गोकुळ श्रावण भालेराव (रा. डांभुर्णी, यावल) अशी सांगितली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी कबूल केले की, ९ सप्टेंबर रोजी त्यांनी आणि त्यांच्या पाचव्या साथीदार संदिप उर्फ आप्पा शामराव कोळी (रा. डांभुर्णी, यावल) यांनी मिळून बऱ्हाणपूरहून जळगावकडे येणाऱ्या कामयानी रेल्वेतील एका प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील पैशांची बॅग हिसकावली होती. त्यानंतर ते रावेर रेल्वे स्टेशनवर उतरून पळून गेले होते. या पैशांचे वाटप करण्यासाठी ते जळगावात एकत्र आले होते.
पुढील तपास भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे
आरोपींच्या या कबुलीनंतर, पोलिसांनी लोहमार्ग पोलीस ठाणे, भुसावळ येथील अभिलेखाची पडताळणी केली. यात फिर्यादी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर) यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा (सीसीटीएनएस क्र. ४५२/२०२५, कलम ३०९(६) भा.न्या.स २०२३) दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यातील ४,५०,०००/- रुपये रोख रक्कम १००% हस्तगत केली आहे. आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासकामी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. या कारवाईत पोहेकॉ प्रीतम पाटील, यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयूर निकम तसेच तांत्रिक मदतीसाठी पोशि गौरव पाटील आणि मिलीद जाधव यांचा सहभाग होता.






