
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जनतेला आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत हवी असल्यास शासनाने डायल ११२ ही सेवा सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा डायल ११२ सेवेला प्रत्युत्तर वेळ सरासरी ९ मिनिटे ४४ सेकंद अशी आहे. जनतेला जलद गतीने मदत पोहचवण्यात जळगाव पोलीस प्रशासन सरस ठरले आहे. काही पोलीस ठाण्यांनी उल्लेखनीय वेग दाखवला असताना, काही ठिकाणी प्रतिसाद वेळ अपेक्षेपेक्षा अधिक आहे. वेळ आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रातील आपत्कालीन सेवेसाठी सुरू असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनच्या प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रतिसाद वेळेचा आढावा घेणाऱ्या अहवालानुसार, चाळीसगाव हायवे पोलीस ठाणे सर्वात जलद प्रतिसाद देणारे ठाणे ठरले आहे. या ठाण्याचा सरासरी प्रतिसाद वेळ हा ००:००:०० इतका आहे, म्हणजेच तात्काळ प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते.
अशी आहे मदतीच्या वेळेची आकडेवारी
चाळीसगाव हायवे ट्रॅफिकनंतर मारवड ६.३१, चाळीसगाव ग्रामीण ६:५४, पिंपळगाव हरेश्वर ६.५६, जळगाव शहर ६.५८, अमळनेर ७:२१ या ठाण्यांनीही चांगला वेळ राखला आहे. दुसरीकडे, चाळीसगाव शहर १३:२४, रामानंद नगर १३:४७, भुसावळ बाजारपेठ १२:४० आणि यावल १२:३३ येथे प्रतिसाद वेळ तुलनात्मक अधिक असल्याचे आढळले आहे. निंभोरा पोलीस ठाण्याचा प्रतिसाद वेळ सर्वाधिक असून तो तब्बल १५ मिनिटे ४ सेकंद इतका आहे.
संथ प्रतिसाद देणाऱ्यांना डोस, जलद मदत करणाऱ्यांचा सन्मान
जळगाव जिल्ह्यातील डायल ११२ ची आकडेवारी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिक कार्यक्षम यंत्रणा तयार करून संथ प्रतिसाद देणाऱ्या पोलीस ठाण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेगवान प्रतिसादामुळे जनतेचा विश्वास वाढतो, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीची हमी मिळते. ज्या पोलीस ठाण्यांनी उत्तम वेळ साधत जलद मदत पोहचवली त्या पोलीस ठाण्यांचा सन्मान करून पोलिसांचे मनोबल अधिक्षकांनी उंचावावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.