Special

कर्तव्यपूर्तीनंतर विठ्ठल सेवेकडे: सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची पायी पंढरी वारी!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । खाकी वर्दीत आयुष्यभर कायदा आणि सुव्यवस्थेची सेवा बजावल्यानंतर, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतून निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले किसनराव नजन पाटील यांनी आता विठ्ठल चरणी लीन होण्याचा मार्ग धरला आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीची त्यांची अनेक वर्षांची मनीषा आता सेवानिवृत्तीनंतर पूर्णत्वास येत आहे. आपल्या जन्मगावी अहिल्यानगर जिल्ह्यातील वडाळा महादेव येथे मातोश्रींची सेवा करत आणि नाशिक येथे कुटुंबासोबत निवांत क्षण घालवत असतानाच, किसनराव पाटील यांनी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाकांक्षी स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे.

पंढरीची वारी… आयुष्यात एकदा तरी पाऊले टाकत विठूनामाचा गजर करत पंढरपूरला जाण्याची आस अनेकांच्या मनात असते. काम, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहात अडकल्याने अनेकांना ती पूर्ण करता येत नाही. परंतु, किसनराव नजन पाटील यांनी नोकरीच्या काळातही विठ्ठलाची सेवा करण्याची इच्छा बाळगली होती, जी आता सेवानिवृत्तीनंतर मूर्त स्वरूपात येत आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट..
गेल्या वर्षी खाकी वर्दीतून निवृत्त झाल्यानंतर, यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी पायी वारीला जाण्याचा संकल्प केला. सोमवार, दि.२३ रोजी त्यांच्या राहत्या गाव वडाळा महादेव येथून त्यांनी पंढरपूरकडे पाऊले टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत परिसरातील पुरुष आणि स्त्रिया असे सुमारे २०० वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत आणि भक्तीरसात न्हाऊन निघत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

कर्तव्यपूर्तीनंतर ईश्वराच्या सेवेसाठी निघालेल्या या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ही वारी अनेकांना प्रेरणा देणारी ठरणार आहे यात शंका नाही.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button