गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काचे हात!
डांगरी व मारवड येथे 'विश्वशांती बहुउद्देशीय संस्था'मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप...

अमळनेर | पंकज शेटे : अमळनेर तालुक्यातील डांगरी व मारवड या ग्रामीण भागांतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा वाहती राहावी, यासाठी विश्वशांती बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रविण बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन इत्यादी साधने अशा विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक गरजांची पूर्तता होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावेत, यासाठी संस्थेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमात आदरणीय भंते संघरक्षित यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगणारे मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षण हीच खरी संपत्ती असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने बाळगून शिक्षणात पुढे जावे.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली.
यावेळी गावातील अनेक पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छायाबाई पानपाटील, समाधान शिरसाठ, विनोद पाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.






