जळगाव RTO प्रशासनाचा मनमानी कारभार; फिटनेस सेंटर अभावी वाहनधारकांचे हाल!
मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील ट्रक RTO कार्यालयात जमा करू

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात ऑटोमेटेड वाहन फिटनेस सेंटर उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर विषयावर जाब विचारणाऱ्या पत्रकाराला प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) राजेंद्र वर्मा यांनी चक्क “फालतू प्रश्न विचारू नका” असे उत्तर दिले. विशेष म्हणजे, महिन्यातून केवळ ८ दिवस कार्यालयात हजर राहणारे अधिकारी आंदोलनकर्त्यांना मात्र दोन दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे आश्वासन केवळ आंदोलन शांत करण्यासाठी आहे की खरोखर कारवाई होणार, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आरटीओ कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात स्वतःचे ऑटोमेटेड फिटनेस टेस्टिंग सेंटर (AVTS) नसल्याने वाहनधारकांना नाशिक (२५० किमी) किंवा छत्रपती संभाजीनगर (१५० किमी) येथे जावे लागते. यामुळे इंधन खर्च, टोल आणि मजुरीचा मोठा आर्थिक फटका वाहनधारकांवर पडत असून वेळेचाही अपव्यय होत आहे.
प्रमुख मागण्या:
* जोपर्यंत जिल्ह्यात नवीन ऑटोमेटेड सेंटर सुरू होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे मॅन्युअल पद्धतीने फिटनेस चाचणी सुरू ठेवावी.
* वाहनधारकांना होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी तात्काळ संक्रमण कालावधी (Transition Period) जाहीर करावा.
*तत्काळ कारवाई नाही झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील ट्रक बोलवून हे RTO कार्यालयात जमा करू.
* वेळेवर फिटनेस प्रमाणपत्र न मिळाल्यास होणारी दंडातून सवलत मिळावी.
जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सैय्यद शाहीद आणि मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी या निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तातडीने निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.






