ब्रेकिंग : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षकपदी राहुल गायकवाड

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पद नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक संदीप पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांना नियंत्रण कक्षाला पाठवत त्यांच्या जागी राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पद म्हणजे पोलीस अधीक्षकांनंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळणारे एकमेव पद असते. गेल्या वर्षी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचा सेवा कालावधी दि.३१ मे २०२४ रोजी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी ड्रग्स प्रकरणात अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.मंगेश चव्हाण यांनी गंभीर बाब समोर आणली होती. एका महिलेचे संदीप पाटील यांनी शोषण केल्याचे त्यांनी सांगितले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण घडामोडी पाहता पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ आदेश काढून पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






