चहार्डी येथे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याची दुर्दशा ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

चहार्डी येथे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याची दुर्दशा ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
चहार्डी, ता. जामनेर (प्रतिनिधी) – शा. शि. पाटील विद्यालयाच्या पुलाजवळील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तेथे पडलेली काळी माती आणि घसरड्या चिखलामुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून शाळेच्या दिशेने यावे लागत आहे. परिणामी अनेक वेळा मुले घसरून पडत असून, परिसरात आरोग्य धोक्यात येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
या रस्त्यालगतच उघड्यावर साचलेली घाण, उकिरड्यांचे साम्राज्य आणि दुर्गंधीमुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचे आरोग्यही संकटात आले आहे. या समस्येविरोधात पालकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
स्थानिक ग्रामपंचायतीकडे दिनांक ३१ मे २०२५ रोजी अधिकृतपणे अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र सरपंच आणि सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निधीची कमतरता दाखवून वॉर्डातील इतर भागांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि काँक्रीट रस्त्यांचे काम सुरू असून, शाळेच्या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांत आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यालयाचे शिक्षक पंकज सर यांनी पुढाकार घेत, स्वतःच्या खर्चाने ट्रॅक्टरने रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती सुधारणा केली. शासकीय यंत्रणा निष्क्रिय असताना पंकज सरांचे हे कार्य समाजात सकारात्मकता निर्माण करणारे ठरले आहे.
– ‘‘जिथे देशाचे भविष्य घडते तिथे दुर्लक्ष होत असेल, तर हे दुर्दैव आहे. आम्ही तातडीने कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी करत आहोत,’’ असे पालकांचे म्हणणे आहे.
या समस्येकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीचे तात्काळ नियोजन करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमध्ये होत आहे.