Social

सर्वज्ञ माध्यमिक विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बोरगाव बु.| राकेश वाणी :- स्पर्श फाउंडेशन, जळगाव संचलित सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव बु. येथे दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सर्वेसर्वा दादासो. रामकृष्ण मधुकर पाटील हे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या शुभप्रसंगी प्रतिमा पूजन श्री. किशोर भास्कर मराठे यांनी केले, तर दीपप्रज्वलन श्री. नितीन प्रभाकर पाटील यांच्या हस्ते झाले. ध्वजपूजनाचा मान श्री. दीपक सुभाष पाटील यांना मिळाला. कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण बोरगाव बु. चे सरपंच दादासो श्री. ज्ञानेश्वर राजाराम मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एच. महानुभाव सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात भारताची समृद्ध विविधता आणि संस्कृती यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला उजाळा देत, त्यांचे आदर्श आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये कवायतीचे बैठे आणि खडे प्रकार सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देतो आणि भावी पिढीला देशाच्या विकासासाठी प्रेरित करतो.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button