ब्रेकिंग : भुसावळ हादरले, तीन दिवसात दोन खून, संशयीत फरार
महा पोलीस न्यूज | १६ फेब्रुवारी २०२४ । भुसावळ तालुक्यात दोन दिवसात दोन खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिंदी ते मोंढाळे रस्त्यावर एका वृध्दाला मारहाण करण्यात आली होती. गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गोजोरा येथे २७ वर्षीय तरूणाला अज्ञात कारणावरून शेतात बोलावून बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विनोद गंभीर कोळी असे मयत तरूणाचे नाव आहे.
विनोद कोळी हा तरूण आपल्या आई, वडील आणि दोन भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदचे वडील गंभीर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपी जितू प्रभाकर डोळे, समा प्रभाकर डोळे यांनी विनोदला मारहाण केली होती. आज शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी विनोदला एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित श्रावण सुपडू डोळे यांच्या मुलाने शेतात बोलावून घेतले.
शेतात संशयित श्रावण डोळे, जितू डोळे, समा डोळे यांच्यासह काही संशयितांनी विनोदला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला सुरूवातीला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी अंती मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस अधिकारी अमोल पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी जळगाव रुग्णालयात येत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.