शनिपेठ पोलिसांचा सिनेस्टाईल थरार, चौकाचौकात सापळा रचून हद्दपार आरोपींना पकडले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातून विविध गुन्ह्यांमध्ये हद्दपार करण्यात आलेल्या दोन आरोपींना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून हे आरोपी शहरात परत आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी तेजस दिलीप सोनवणे यास उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव यांनी हद्दपार केले होते. त्याचप्रमाणे, सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे यास पोलीस अधीक्षकांनी विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सर्व हद्दपार आरोपींच्या शोधार्थ मोहीम हाती घेतली.
इमारतीवरून मारली उडी, एक कर्मचारी जखमी
बुधवार दि.२० ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या पेट्रोलिंग दरम्यान, पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हे दोन्ही आरोपी कोणत्याही वैध कारण किंवा कायदेशीर परवानगीशिवाय त्यांच्या राहत्या घरी वास्तव्यास आहेत. या माहितीची खात्री करण्यासाठी त्यांनी पथकासह सापळा रचला. तेजस सोनवणे याने पोलिसांना पाहताच पळ काढला. घराच्या इमारतीवर जाऊन त्याने शेजारच्या इमारतीवर उडी मारली. तिथून गेटच्या भिंतीवरून पळ काढला. पोलिसांनी चौकाचौकात सापळा लावलेला असल्याने तो तावडीत सापडला. दरम्यान, झटापटीत पोलीस कर्मचारी नवजीत चौधरी यांच्या बोटाला आणि खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
पथकाने केली कारवाई
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी आणि काजोल सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात दोन्ही आरोपी त्यांच्या घरात मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
१५ दिवसापूर्वी देखील कारवाई
यापूर्वीही, ७ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दपार करण्यात आलेला आरोपी स्वप्नील ऊर्फ गोल्या धर्मराज ठाकूर हा देखील शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील डी.एन.सी. कॉलेज परिसरात गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करत असताना पोलिसांना सापडला होता. त्यावेळी त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षकांच्या कामाचे कौतुक
या घटनांवरून, हद्दपार केलेले गुन्हेगार पुन्हा शहरात येऊन कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, पोलीस अशा आरोपींवर कठोर कारवाई करत आहेत. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.






