जळगावात अवैध शस्त्र विक्रीचा पर्दाफाश ; गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात अवैध शस्त्र विक्रीचा पर्दाफाश ; गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव, प्रतिनिधी ;- शहरातील शनिपेठ पोलिसांनी गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत अवैध शस्त्र विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. ज्ञानदेवनगर ते काशिनाथनगर रोडवर ही कारवाई करण्यात आली असून, या वेळी एक गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राकेश दिलीप भावसार (वय ४१, रा. सदाशिवनगर) हा एका गावठी पिस्तूलसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे समजताच पोउपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ कारवाई केली. ११:४५ वाजता पोलिसांनी संबंधित रस्त्यावर छापा टाकून राकेश भावसारला ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला लपवलेला गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे सापडल्याने त्यास अटक करण्यात आली.
चौकशीत राकेशने ६ एप्रिल २०२५ रोजी प्रसाद संजय महाजन (वय २८, रा. ज्ञानदेवनगर) याच्याकडून ५४,००० रुपये रोख रकमेने हे शस्त्र खरेदी केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी प्रसाद महाजनलाही अटक केली. दोघांनी संगनमताने अवैध शस्त्राची खरेदी-विक्री केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत पोउपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ युवराज कोळी, रविंद्र बोदवडे, शशिकांत पाटील, अनिल कांबळे आणि पराग दुसाने यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.