जळगावात महा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, कैलास सोनवणे, महिला आघाडी, भाजयुमोतर्फे आयोजन
जळगाव :- राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले असून आज महायुती सरकारचा महा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. जळगाव शहरात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महिला आघाडी, भाजयुमोतर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी बांगलादेश येथे भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला.
राज्यात नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज ना.देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला. जळगाव शहरात शनिपेठ परिसरात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी महापौर भारती सोनवणे यांच्यातर्फे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जनतेला दाखवण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच फटाके फोडून आणि पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. प्रसंगी माजी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महेंद्र गांधी, राजू पिंपरकर, अजय जैन, अनिल बाफना, विपुल पारेख, गोपाळ भोळे, राजू चव्हाण, अनिल पाटील यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती सोनवणे, सरचिटणीस नंदिनी दर्जी, चिटणीस संगीता पाटील, माजी नगरसेविका किरण राणे, उत्तर विभागीय संयोजिका रेखा पाटील, गीता नागला, अपर्णा भालोदकर, संगीता समदानी, पुजा आसरी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांनी व्यक्त केला आनंद आणि ‘त्या’ घटनेचा निषेध
आज आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याचा आम्हाला आनंद असल्याची भावना उपस्थित लाडक्या बहिणींनी व्यक्त केली. तसेच आमच्या दुसऱ्या भावांना बांगलादेशमध्ये त्रास सहन करावा लागत असल्याने त्या घटनेचा निषेध देखील भगिनींनी केला. प्रसंगी बांगलादेशमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याने बांगलादेशच्या झेंड्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.