ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाने १० लाखांचा गंडा, सायबर टीमने एकाला पकडले
महा पोलीस न्यूज | २५ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातील एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याचे आमीष देत १० लाखांना गंडविल्याचा प्रकार घडला होता. जळगाव सायबर पोलिसांनी याप्रकरणी शोध घेत एका संशयीत आरोपीला मुंबई चेंबूर परिसरातून अटक केली आहे.
जळगावातील चौधरी यांना २८ नोव्हेंबर २०२३ ते दि.१५ जानेवारी २०२४ दरम्यान अज्ञात इसमांनी APEX या कंपनीमार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे खोटी बतावणी करुन APEX हे ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले होते. ॲपमध्ये शेअर खरेदी करण्यासाठी आरोपींनी चौधरी यांच्याकडून वेळोवेळी ९ लाख ८२ हजार ५० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात पाठवायला सांगितले होते.
पैसे स्विकारुन त्याबदल्यात फिर्यादी यांना नफा व मुद्दल रक्कम परत न देता स्वःताचे आर्थिक फायद्यासाठी घेतल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला होता. जळगावातील सायबर गुन्हे शोध पथकाने अधिक तपास केला असता संशयीत आरोपी अशरफ उमर सैय्यद, वय-२६ रा. ह.मु. विष्णु नगर, म्हाडा वसाहत, चेंबुर यास दि.२४ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. अश्रफ याने आपले EQUITAS Bank बँकेचे अकाउंट टक्केवारीने वापरण्यास दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
पथकाने अश्रफ यास सापळा रचून अटक केली आहे. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सायबर पो.स्टे.चे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंतराव बेलदार, प्रदीप चौधरी, प्रशांत साळी, हेमंत महाडीक तसेच जाधव व गौरव पाटील यांनी केली आहे.