घरफोडी करणारे एमआयडीसी ‘डीबी’च्या जाळ्यात, मुद्देमाल हस्तगत

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील लक्ष्मी नगर परिसरातील एका बंद घरात झालेल्या घरफोडीचा उलगडा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेंद्र दुसाने हे कुटुंबासह दोन महिन्यांपासून पुण्यात राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जळगावात येऊन घराची पाहणी केली. घरातील एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर, गॅस शेगडी, गॅस हंडी, तांबे-पितळ भांडी आणि अन्य वस्तू चोरीस गेल्याचे आढळल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, गणेश शिरसाळे, किशोर निकुंभ, प्रमोद लांडवंजारी, किरण चौधरी, शशिकांत मराठे आणि नरेंद्र मोरे यांनी तपासाला वेग दिला. गोपनीय माहितीच्या आधारे १३ नोव्हेंबर रोजी पथकाने संदीप तुळशीराम शेवरे (रा.लक्ष्मी नगर) याला सापळा रचून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार राहुल सुपडू चौधरी व एका अल्पवयीन मुलासह घरफोडी केल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर, गॅस शेगडी, गॅस हंडी, तांबे-पितळ भांडी जप्त करण्यात आले. यानंतर १४ नोव्हेंबर रोजी दुसरा आरोपी राहुल सुपडू चौधरी यालाही अटक करण्यात आली. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा देखील पोलीसांनी हस्तगत केली आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.






