ब्रेकिंग : शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख रहस्यमयरीत्या बेपत्ता

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शिवसेना पक्षाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख व सेवानिवृत्त शिक्षक संजय लोटन पाटील (वय ५८, रा.दोनगाव, ता.धरणगाव, जि. जळगाव, सध्या रा.धुळे) हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय लोटन पाटील हे दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता धुळ्यातील राहत्या घरातून “कामानिमित्त गावाकडे जातो” असे सांगून निघाले. त्यानंतर ते परतले नाहीत. पारोळा चौफुली, धुळे येथे नातेवाईक धनराज पाटील यांनी त्यांना त्यांच्या वाहनाने अमळनेर बसस्थानकावर ११ वाजता सोडले होते.
यानंतर, संध्याकाळी ६.१० वाजता जळगावातील गोलीणी मार्केट रोड परिसरात ते शेवटचे दिसले. जळगावातील एका बँकेतून त्यांनी काही पैसे काढले आणि ते पायीच न्यायालयाच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विशेष म्हणजे ते धुळे येथून निघाल्यापासून त्यांचा मोबाईल बंद असून त्यांचा काहीही शोध लागलेला नाही.
संजय पाटील यांचे दोन्ही मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद आढळला. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची खात्री झाल्यानंतर नातेवाईकांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर पोलीसांनी शोधमोहीम सुरू केली असून, पाटील यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या घटनेने जळगाव आणि धुळे परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.






