Politics

अमळनेरात ओव्हरलोड डंपरचा हैदोस! रस्ते खड्ड्यात, नागरिक धास्तावले

अमळनेरात ओव्हरलोड डंपरचा हैदोस! रस्ते खड्ड्यात, नागरिक धास्तावले

शिवसेनेचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी):शहरातील शांतता आणि सुरक्षिततेला सध्या ओव्हरलोड रेती डंपरच्या सुसाट वेगाने सुरुंग लावला आहे. नियमांची पायमल्ली करत शहराच्या छाताडावरून धावणाऱ्या या अनधिकृत वाहतुकीमुळे रस्ते तर उद्ध्वस्त होत आहेतच, पण सामान्य नागरिकांचा जीवही टांगणीला लागला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेना आक्रमक झाली असून, तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


प्रशासनाच्या नाकाखाली नियमांचा ‘चुरा’
अमळनेर शहर आणि परिसरातून सध्या रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त रेती भरून हे डंपर शहरातून दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही बेधडकपणे धावत आहेत. ओव्हरलोडिंगमुळे शहराचे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते उखडले जात असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने, “या वाहतुकीला कोणाचे अभय आहे?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

रात्रीचा थरार आणि सुरक्षेचा प्रश्न
काही डंपर चालक तर रात्रीच्या वेळी अत्यंत बेधडकपणे आणि भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. यामुळे अपघाताची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकारामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेनेचा ‘अल्तिमेटम’: अन्यथा रस्त्यावर उतरणार!
या संदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख गुलाबराव पाटील, नगरसेवक साहेबाराव पवार, गटनेता पंकज चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. या तक्रारीत  म्हटले आहे की:ओव्हरलोड डंपर वाहतुकीची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी.बेकायदेशीर आणि नियमबाह्य वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी.जर प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलली नाहीत, तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनावर प्रथमेश पवार (उपजिल्हा प्रमुख), गुलाबराव पाटील (तालुका प्रमुख), साहेबाराव पवार (नगरसेवक), पंकज चौधरी (गटनेता), भरत पवार (शहर प्रमुख), विलास कंखरे (शहर प्रमुख), नाविद शेख (नगरसेवक) आणि प्रवीण पाटील (युवासेना शहर प्रमुख) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आता या इशाऱ्यानंतर तरी प्रशासन झोपेचे सोंग सोडून या ‘रेती माफियांवर’ लगाम लावणार का? याकडे संपूर्ण अमळनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button